Saturday, March 15, 2014

शेअर विदाउट केअर?

माधव शिरवळकर



आली पोस्ट केली शेअर.. आला मेसेज केला फॉरवर्ड.. त्याच्यामागे नसतो कुठलाच विचार अथवा विवेक.. जणू अदृश्य माकडांच्या हाती दिलेलं कोलीतच..! सोशल मीडियाच्या अंगणात स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचे थैमान सुरू राहतं.. त्याला बांध घालायचा कसा आणि रोखायचे तरी कसे?.. सोशल मीडियाचा विधायक वापर होतच नाही असे अजिबात नाही, पण वेगाने वाढणार्‍या या विकृतींचे काय?..



शाळेमध्ये प्रश्नपत्रिकेत निबंधाचा एक विषय हमखास ठरलेला असे. ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे’ हा तो विषय. स्वातंत्र्याचा फायदा घेऊन झालेल्या स्वैराचाराची उदाहरणं सांगत तो निबंध लिहावा लागे. तशी उदाहरणं शोधता-शोधता विद्यार्थ्यांच्या नाकी नऊ येत; पण आज त्या विषयावरचा निबंध लिहिणं फार सोपं झालं आहे. कारण, माध्यमस्वातंत्र्याचा फायदा उठवून स्वैराचार बोकाळल्याची उदंड उदाहरणं सोशल मीडियावर आज पाहायला मिळतात. सोशल मीडिया हे एक मुक्त आकाश आहे. ते आकाश व्यापणारे मोठे ढग म्हणजे फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, यु ट्यूब, व्हॉट्सअप किंवा इन्स्टाग्रामसारखी मोबाईल अप्स वगैरे. या ढगांनी समाजाला पोषक असा नीतिमत्ता उंचावणारा पाऊस पाडावा, अशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. एवढंच नव्हे, तर कायदा आणि सुव्यवस्था व सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनंही ती एक गरज आहे. हे ढग असा विधायक पाऊस पाडतात, याची लाखो उदाहरणं आहेत. पण, दुसरीकडे हे ढग जागतिक स्तरावर भयानक जीवघेणी गारपीट करून सामाजिकदृष्ट्या प्रचंड विध्वंसही करताना दिसतात. सोशल मीडियावर ही जी बेजबाबदार गारपीट सतत चाललेली असते, ती जगात सर्वत्र दिसते. सोशल मीडियावर एकीकडे विधायक गंगा वाहते, तर दुसरीकडे जगणं असह्य करणारी गटारगंगा तीत येऊन मिसळते. या गटारगंगेवर काय उपाय करावा, याचं उत्तर जगात अजून कुणालाही सापडलेलं नाही. त्यामुळे जगातील सर्वच राज्यकर्ते सोशल मीडियाच्या नावानं लाखोली वाहताना आणि दातओठ खाताना दिसतात. कधी ते कपिल सिब्बल असतात, तर कधी सुशीलकुमारजी; कधी ओबामा, तर कधी सिंगापूरचे पंतप्रधान.

अनिर्बंधित, सहजप्राप्य माध्यम

वृत्तपत्रे, विविध टीव्ही वाहिन्या यासारखी प्रसारमाध्यमं देशोदेशी विविध कायद्यांनी बांधलेली असतात. आपली विश्‍वासार्हता जपण्यासाठी त्यांची ती प्रयत्न करीत असतात. कारण, प्रसारमाध्यमांनी विश्‍वासार्हता गमावणं म्हणजे स्वत:चं अस्तित्व गमावणं, हा विचार आजही स्वीकारला जातो. त्यातुलनेत इंटरनेटवरचा सोशल मीडिया हा संपूर्णपणे अनिर्बंध असा आहे. त्यासाठी जागतिक स्तरावर सर्वव्यापी असे कोणतेही कायदेकानू आज उपलब्ध नाहीत. देशांतर्गत कायदेही अपुरे आणि भरपूर संदिग्धता भरलेले आहेत. स्वाभाविकच सोशल मीडियावरच्या समाजकंटकांना न्यायालयात खेचून जरब बसवणं यंत्रणांना जिकिरीचं जातं. एकीकडे या र्मयादा, तर दुसरीकडे माध्यमस्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही लिहिण्याचा, दाखवण्याचा अधिकार लोकशाहीत आहे, या गैरसमजाची सोशल मीडियाला झालेली बाधा यांमुळे स्वातंत्र्याच्या अंगणात भयानक स्वैराचार कधी सुरू झाला, हे लक्षातही येत नाही. सोशल मीडिया हा सहजप्राप्यही आहे. वृत्तपत्र प्रसिद्ध करणं अवघड आहे. दूरचित्रवाणी माध्यमात वाहिनी सुरू करणं आवाक्याबाहेरचं आहे; पण काही मिनिटांत एक दमडीही न देता स्वत:च्या हातातल्या मोबाईलवर वा संगणकावर सोशल मीडियाच्या माध्यमात कोणालाही, काहीही प्रसिद्ध करणं सहजशक्य असतं. जबाबदारीची भावना, सुसंस्कृततेची किनार ही सोशल मीडियावर येण्यासाठीची अट नसतेच. अशा वातावरणात मग खूपदा अनर्थ होताना दिसत असतो.

एका शाळेच्या बाबतीत घडलेला किस्सा आहे. त्या शाळेतल्या एक शिक्षिका जरा कडक होत्या. विद्यार्थ्यांना शिक्षा देणं, टोचून बोलणं हे त्यांच्या बाबतीत नेहमीचं होतं. स्वाभाविकच विद्यार्थ्यांमध्ये त्या अप्रिय होत्या. त्यांना धडा शिकवण्यासाठी बाईंच्या शालेय विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया हाताशी धरला. बाईंचे बनावट फोटो, बाईंच्या बाबतीतले खरे-खोटे व अतिशयोक्तीपूर्ण किस्से आणि बदनामी खोट्या फेसबुक अकाउंटमधून सुरू झाली. बाईंपर्यंत ते पोहोचेपर्यंत त्याचं प्रसारण जगभर झालेलं होतं. बाई या बदनामीनं मानसिकदृष्ट्या पार ढासळून गेल्या. दुसरीकडे, शाळेतच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचं तीक्ष्ण शस्त्र वापरण्याचं बाळकडू मिळवलं होतं. ही मुलं पुढे जेव्हा वयात येतात, महाविद्यालयात जातात, तेव्हा हे बाळकडू त्यांच्याबरोबरच असतं.

एका वेळी असंख्य अदृश्य माकडांच्या हाती कोलीत असावं आणि त्यांनी आग लावत फिरत राहावं व अदृश्य असल्यानं त्यांना पकडता येऊ नये; पण जगानं मात्र त्या आगीत होरपळत राहावं, अशी स्थिती यातून तयार होते. अशी स्थिती आज सर्वच देशांमध्ये ठिकठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये दिसते. राजकारणात आणि उद्योगांमधील स्पर्धेत त्याचा उपयोग करून घेतला गेला नाही, तरच नवल!





सोशल मीडिया : गरज आणि मानवी संस्कृती

समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात. त्या व्यक्त करण्यासाठी जवळच्या व्यक्ती, आप्तगण, मित्र यांचं व्यासपीठ तिला मिळे. आपल्या भावना ती त्यांच्यापाशी व्यक्त करी, तेव्हा त्यात आपलेपणा आणि खासगीपणाची भावना अशा र्मयादा राखणार्‍या गोष्टी असत. सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यात र्मयादांची कुंपणं केव्हा कोसळतात, हे बड्याबड्यांच्या लक्षात येत नाही आणि मग त्यातून माणसं भावनिकदृष्ट्या जायबंदी होताना दिसतात. सोशल मीडियात बोलता-बोलता कालचे जिवलग मित्र शत्रू कधी झाले, हे कळतही नाही. खरं पाहता, फेसबुक काय किंवा व्हॉट्सअपसारखे मोबाईल अप काय; त्यांची भूमिका कोर्‍या कागदाची असते. त्या कागदावर लिहिणार्‍यानं काय लिहावं, यावर त्यांचं थेट नियंत्रण काहीच नसतं. लिहिणार्‍यानं ज्या क्षणी लिहिलं, त्याच्या पुढल्या क्षणी अखिल जगतानं ते पाहिलं, असा मामला असतो. इतका वेग, इतका तत्काळ संपर्क मानवाला हवाहवासा वाटणं स्वाभाविक आहे. कुणी तरी काही तरी लिहिलं, ते योग्य आहे किंवा नाही, हे कुणी तरी तपासलं आणि नंतर ते प्रसारण करण्याची परवानगी मिळाली, अशी सेन्सॉर व्यवस्था करणं हे आज तरी अशक्यकोटीतलं आहे. उद्या भविष्यकाळात खुद्द तंत्रज्ञानानंच मानवानं लिहिलेलं जाणलं आणि अयोग्य ते थांबवलं, असं होणं शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर ‘ते अशक्य नाही’ असं द्यावं लागेल. मात्र, तंत्रज्ञानाला मानवी मेंदूची भावनिक कार्यक्षमता जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंंत ते अशक्य आहे, ही बाबही विसरता येणार नाही. मग तोपर्यंत काय, हा पुढला प्रश्न आज जगापुढे आहे. हा पुढला प्रश्न वेगवेगळ्या देशांनी आपला आपण आपापल्या पद्धतीनं सोडवला, असं होऊ शकणार नाही. कारण, भारतातल्या व्यक्तींची बदनामी अमेरिकेत वा अन्य कुठल्या तरी देशात बसून केली जाऊ शकते किंवा उलटंही होऊ शकतं. अशा वेळी सोशल मीडियाला आपली नीतितत्त्वं स्वत:ची स्वत: आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करावी लागतील. युनिकोडची यंत्रणा जगातल्या विविध लिप्यांच्या बाबतीत जशी जगानं स्वीकारली, तशीच व्यवस्था सोशल मीडियासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणं अपरिहार्य आहे. हे अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीचं आहे; पण अशक्य नाही. जोपर्यंंत अशी व्यवस्था जगात अस्तित्वात येणार नाही, तोपर्यंंत सोशल मीडिया आपलं स्वातंत्र्य जपण्याच्या प्रयत्नात त्यातून स्वैराचाराचा भ्रष्टाचार जगभर अनिर्बंंधपणे माजवीत ठेवणार. अशा स्थितीत सोशल मीडिया ही मानवजातीसाठी पवित्र गंगा असावी, अशी इच्छा हा एकीकडे कायम आदर्शवाद राहणार आणि दुसरीकडे गंगेत नियमितपणे मिसळणारी सोशल मीडियातली असंख्य गटारं, ही वास्तवता कधीच बदलणार नाही. गेल्या काही वर्षांंमध्ये जगानं सोशल मीडिया रुजवला; आता येती काही वर्षंं त्यातलं तण आणि विषारी रोपं निपटण्यासाठी द्यावी लागणार, हे क्रमप्राप्त आहे.

(लेखक ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आहेत.)



from Lokmat Marathi News : Manthan-Main (वैचारिक मंथन-मुख्य)

Bagikan

Jangan lewatkan

शेअर विदाउट केअर?
4/ 5
Oleh

Subscribe via email

Suka dengan artikel di atas? Tambahkan email Anda untuk berlangganan.