Saturday, March 15, 2014

प्राप्त परिस्थिती स्वीकारून परमार्थ

स्वामी मकरंदनाथ



नोकरी-उद्योगातील असुरक्षितता, शारीरिक व्याधी या सर्व अडचणींवर मात करून, जिद्दीने परमार्थ करायचा आहे. साधना सांभाळायची आहे. भगवंत कृपाळू आहे, सांभाळून घेणारा आहे. आपण आपल्याकडून शक्य ते सर्व करावे.



आयुष्य वेगाने संपते. काळ सरत जातो. जीवनातील हे वास्तव आपण समजून स्वीकारावे. बालपण अज्ञानातच जाते. तारुण्य संपून मध्यम वयदेखील आपण चटकन ओलांडतो आणि बघता-बघता वृद्धापकाळ दृष्टिपथात येतो. आपली शारीरिक स्थिती आपल्याला तशी जाणीव करून द्यायला लागते. एक मात्र खरे, की आजच्या काळात साठ- सत्तर वर्षांची व्यक्तीही तुलनेने पाहिले, तर प्रकृतीने उत्तम असते. पूर्वीच्या काळातील परिस्थिती आज नाही. प्रगत विज्ञानामुळे चांगले वैद्यकीय उपचार व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्या योगाने छोट्या-मोठय़ा शारीरिक तक्रारींवर मात करून परमार्थासाठी देह दीर्घकाळ वापरणे साधकाला शक्य झाले आहे. आपण आपल्या प्रकृतीची योग्य ती काळजी घ्यावी. शारीरिक र्मयादेपोटी मांडी घालून ध्यानाला बसता येत नसेल, तर खुर्चीवर बसले तरी चालेल. ताठ बसणे कठीण जात असेल, तर भिंतीला टेकून बसावे. आपण ज्या वयात आहोत, ज्या परिस्थितीत आहोत, त्या परिस्थितीशी जमवून घेऊन आपल्याला साधना करायची आहे, परमार्थ करायचा आहे. आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवायचा आहे.

एक लक्षात घ्या, या जगात आपण एकटे येतो आणि एकट्यालाच परत जायचे असते. जन्मभर केलेल्या बर्‍या-वाईट कर्मांचे संस्कार घेऊन त्यानुसार जीव पुढच्या प्रवासाला निघतो. त्याक्षणी इतर कोणाचाही, कसलाही उपयोग आपल्याला होत नाही. मग, ती व्यक्ती कितीही जवळची असो. सर्मथ म्हणतात,

‘कर्मयोगे सकळ मिळाली।

एके स्थळीं जन्मासी आली।

ते तुवां आपुली मानिली।

कैसी रे पढतमूर्खा।।’

या जगताच्या मायेमुळे आपण सगळ्यांना आपले समजतो. ममत्त्वाने त्यांच्यात गुंतून पडतो. अनेक वर्षं संगतीला असलेली व्यक्ती अचानक आपल्याला सोडून जाते. कोणाचे काही सांगता येत नाही, खरे तर जीवनाच्या कल्पनेत मृत्यूची कल्पनाही असावी, सुखाबरोबरच दु:खाची कल्पनाही केलेली असावी. जीवनात अनुकूलतेबरोबर प्रतिकूलताही असते. तुम्ही ऑफिसमध्ये होणार्‍या त्रासाची कल्पना करू शकता, सासूच्या त्रासाची, सुनेच्या त्रासाची कल्पना करू शकता. कारण, या गोष्टी जीवनामध्ये आहेतच. आपल्या घरात येणारी सून कशी असेल सांगता येत नाही, आपल्या मुलीला दिलेले घर, तेथील माणसे कशी असतील सांगता येत नाही! संसारात येईल त्या परिस्थितीला सामोरे जावेच लागते. आपल्या शक्ती, बुद्धीप्रमाणे आपली कर्तव्यकर्म उत्तम पार पाडावीत आणि त्यात ममत्त्वानी गुंतून राहू नये. हाच संगत्याग आहे. हे कठीण वाटले, तरी आपल्याला परमार्थाकरिता या परीक्षेत उतरून पार व्हायचे आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तर्‍हेच्या अवघड परिस्थितीतून जावे लागतेच. संसाराचे स्वरूपच असे चमत्कारिक आहे. नोकरी-उद्योगातील असुरक्षितता, शारीरिक व्याधी या सर्व अडचणींवर मात करून जिद्दीने परमार्थ करायचा आहे. साधना सांभाळायची आहे. भगवंत कृपाळू आहे, सांभाळून घेणारा आहे. आपण आपल्याकडून शक्य ते सर्व करावे. त्यात जे न्यून राहील ते भगवंत पूर्ण करील. आपण जास्तीत जास्त नेटाने साधना करण्याचा प्रयत्न मात्र करायचा आहे. भगवंत यश दिल्याखेरीज राहणार नाही. तो आपल्याला भक्ती देईल, चित्तशुद्धी देईल, सुख-समाधान, शांती देईल. आपल्या प्रयत्नात प्रामाणिकपणा असावा म्हणजे झाले. थोडी तितिक्षा, थोडे धैर्य ठेऊन राहायला लागेल. जी परिस्थिती वाट्याला आली आहे, ती सहजतेने स्वीकारायची असे ठरवा. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेऊन जर आपण राहिलो, तर मग प्रतिकूल परिस्थितीतदेखील बोध सांभाळता येईल!

(लेखक पुणेस्थित असून, नाथ संप्रदायातील

स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक

अधिकारी आहेत.)



from Lokmat Marathi News : Manthan-Main (वैचारिक मंथन-मुख्य)

Bagikan

Jangan lewatkan

प्राप्त परिस्थिती स्वीकारून परमार्थ
4/ 5
Oleh

Subscribe via email

Suka dengan artikel di atas? Tambahkan email Anda untuk berlangganan.