Saturday, March 15, 2014

जनतेच्या नजरेतील ज्ञानकेंद्रे

प्रा. डॉ. द. ता. भोसले



‘‘आज तुम्ही लग्नासाठी इमारत मागितली, उद्या एखादा लावणी स्पर्धेसाठी मागायला कमी करणार नाही. मग कशाला नकार द्यायचा नि कशाला होकार द्यायचा? ही प्रथाच पडून जायची. फार तर तुम्ही दुसर्‍या एखाद्या कार्यासाठी आमचं मैदान घ्या. त्यावर मंडप टाका. आपली महाविद्यालये ही ज्ञानाची मंदिरे राहू द्या. भजन, कीर्तनाची आणि जेवणावळीची खाणावळ करू नका.’’





महिना वैशाखाचा; लग्नसराईची धामधूम मोठय़ा जोरात सुरू झालेली; एकेका दिवसात तीन-तीन, चार-चार विवाह सोहळे; अशा या धामधूमीच्या काळात भरदुपारी गावातले तीन-चार पुढारी कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यातले एक नगरपालिकेचे सदस्य होते. उरलेले या पुढार्‍याचे मित्र आणि कार्यकर्ते असावेत. सर्वांच्या अंगावर राजकीय पुढार्‍याला शोभणारे कडक इस्त्रीचे कपडे होते. प्रत्येकाच्या हातामध्ये जाडजूड दोन-तीन सोन्याच्या अंगठय़ा. चहापाणी झाले. हवा-पाण्याच्या गप्पा झाल्या आणि नंतर एका कार्यकर्त्याने येण्याचे कारण सांगितले. तो म्हणाला, ‘‘येत्या चार तारखेला आपल्या साहेबांच्या थोरल्या मुलीचा विवाह आहे. साहेबांच्या घरातले हे पहिलेच लग्न. तेव्हा आपल्या गावातले आणि तालुक्यातली झाडून सारी मंडळी येणार. गावातील राजकीय नेते, झेड. पी. चे. सारे नेते, चार तालुक्यांतले आमदार या लग्नाला येणार. सायबांच्या चांगल्या संबंधातले एक-दोन मंत्रीही येतो म्हणालेत. शिवाय अधिकारी, व्यापारी, सोसायटी व डेअरीचे पदाधिकारी येणार आहेत. या सार्‍यांची व्यवस्था होण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुमच्या कॉलेजचे प्रशस्त वर्ग, दोन्ही वसतिगृहातील खोल्या आणि तुमचे खेळाचे मैदान आम्हाला दोन-तीन दिवस यासाठी लागणार आहे. हजारोंच्या संख्येने येणार्‍या पाहुण्यांची व्यवस्था त्याशिवाय होणार नाही. कॉलेजला दोन-तीन दिवस सुट्टी द्या. म्हणजे स्वच्छतेबरोबरच सोयी-गैरसोयी पाहता येतील. येणार्‍या पाहुण्यांची सोय आणि बडदास्त ठेवण्यात आपण कुठे कमी पडू नये, यासाठी ही विनंती करतो आहे.’’

नगरसेवक असलेले पुढारी म्हणाले, ‘‘आमची चित्रा तुमच्याच कॉलेजची विद्यार्थिनी; शिवाय तुमच्या या कॉलेजला पहिल्यापासून आमची मदत होतच असते. आमची म्हणजे नगरपालिकेची.’’ या वाक्याचा लक्षणार्थ असा, की आतापर्यंत आम्ही खूप मदत केली आहे. त्याची परतफेड म्हणून इमारती आमच्या हवाली कराव्यात, नव्हे लागले तर मनुष्यबळही पुरवावे. प्राचार्य, मी आणि कॉर्मस विभागाचे प्रमुख आम्ही एकमेकांकडे बघत बसलो. त्या तिघांच्या नजरेचा अर्थ असा, की ही काही आपल्या आचारधर्मात आणि प्रशासनात बसणारी गोष्ट नाही. तीन-चार दिवस कॉलेज बंद ठेवायचे म्हटले, तर शहरातील आणखी काही जण अशीच मागणी करतील. वर्षभरात अशा आठ-दहा मागण्या आल्या, तर दीड महिना कॉलेज बंद ठेवावे लागेल. ते सर्वच दृष्टीने अयोग्य होते. शिवाय, विवाह सोहळा म्हटल्यावर सारे वर्ग घाण होणार, जेवणावळीसाठी वापरलेले वर्ग आणि सभागृहात सांडलेल्या अन्नपदार्थांमुळे अस्वच्छ होणार. येणारे पाहुणे गुटखा, तंबाखू खाऊन कुठेही थुंकणार. नीट न वापरल्यामुळे संडास व स्नानगृहे अस्वच्छ होणार व महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे तीन-चार दिवस अध्यापन थांबणार. या सर्वांचे फलित काय, तर आपल्या साहेबाचे हे लग्न मोठय़ा थाटामाटात झाले, असे लग्न यापूर्वी झालेच नाही. हेच फलित समोर येणार. हा सारा विचार करून प्राचार्य त्यांना म्हणाले, ‘‘आबासाहेब तीन-चार दिवस कॉलेज बंद ठेवून सारे वर्ग तुमच्या ताब्यात देणे, एक तर योग्य नाही. ती अशैक्षणिक गोष्ट आहे आणि मला तो बंद ठेवण्याचा अधिकार नाही. दुसरी काही मदत लागली, तर आम्ही देऊ.’’ त्यांना हे उत्तर अपेक्षित नसल्याने खूपच चिडले. रागीट चेहरा करून ते म्हणाले, ‘‘ का देत नाही तुम्ही मला, पटेल असं कारण सांगा? तुमच्या या कॉलेजसाठी एवढी चार एकर जमीन आम्ही मिळवून दिली. नगरपालिकेत ठराव करून एक लाखाची देणगी आम्ही दिली. तुमच्या कॉलेजसाठी चांगला रस्ता करून दिला आणि सरळ तुम्ही नाही म्हणता? कमाल आहे तुमची.’’ क्षणभर थांबून शांतपणे प्राचार्य म्हणाले, ‘‘आबासाहेब हे आमचं कॉलेज नाही. ‘तुमचं’ कॉलेज आहे. तुमच्या शहरातली, परिसरातील गोरगरिबांच्या मुलांनी शिकावं म्हणून हे काढलं आहे. हे कॉलेज नसतं, तर या खेड्यातल्या मुली शिकल्या असत्या का? दुसरी गोष्ट अशी, की तुम्ही एक लाख दिले नाहीत. नगरपालिकेने ते दिलेले आहेत. म्हणजे जनतेने मदत केली आहे. खेड्यापाड्यातल्या शेतकर्‍यांनी मदत केली आहे. शिवाय तुमच्या या एक लाखात किती बांधकाम झाले असते? त्यासाठी इथला विद्यार्थी राबला आहे. इथल्या स्टाफनं पडेल ते काम केलं आहे.’’

क्षणभर सारेच गप्प झाले. थोड्या वेळाने आबासाहेबांचे शेजारी बसलेले कार्यकर्ते एकदम उसळून म्हणाले, ‘‘आमच्यामुळे तुम्हाला नोकरी मिळाली. आमच्यामुळे तुमच्या पोटाला भाकरी मिळाली. आमच्यामुळे तुम्हाला हे दिवस दिसताहेत, हे विसरू नका.’’ कार्यकर्त्यांचं हे बोलणं मला फार मग्रुरीचं आणि अहंपणाचं वाटलं. मला राहावले नाही, मी म्हणालो, ‘‘ही संस्था तुम्ही काढली का? त्यासाठी तुम्ही काय त्याग केला? आमची नेमणूक तुम्ही केली का? आमचा पगार तुमच्या खिशातून मिळतो का? आणि आम्ही जे काही शिकलो त्याला तुमची मदत झाली का? असं बोलणं बरं दिसत नाही, तुम्हाला पाटील. आता तुम्हीच विषय काढला म्हणून सांगतो, तुम्ही जी चार एकर जमीन दिली म्हणता ती तुमचीही स्वत:ची नव्हती. नगरपालिकेचीही नव्हती. शासनाचे ते पडिक माळरान होते. शासनाने ती दिली. या जमिनीऐवजी तुमच्या जमिनीला खेटून असणारं माळरान द्यावं, असा तुम्ही प्रयत्न केला. हेतू असा, की त्यामुळे तुमच्या माळरानाला सोन्यासारखी किंमत मिळेल. तुम्हाला एखादा उद्योग सुरू करता येईल. तुमचा छुपा विरोध मोडून आम्ही ही जागा मिळवली आहे.’’ एक मिनिटभर थांबून मी पुन्हा म्हणालो, ‘‘आबासाहेब, यात आमचं नुकसान नाही. तुमचं नुकसान आहे. तुमच्या मुलांचं नुकसान आहे. तुमची ही मुलं चार दिवस कॉलेज बंद म्हटल्यावर आठ दिवस तोंड दाखवणार नाहीत. घरी कॉलेजला चाललो म्हणून नुसती दिवसभर उंडारतील. त्यांना आपणच शिस्त लावायला पाहिजे.’’

‘‘तुम्हाला आमच्या ओळखीच्या मंत्र्याकडून फोन आल्यावर काय करणार? द्याल की नाही? त्यापेक्षा तुम्हीच मोठं मन दाखवा. आमच्या साहेबांना जागा देण्याचं नाकारलं, तर तुमचं पदोपदी नाक दाबलं जाईल. लोक खपवून घेणार नाहीत,’’ हे तिसरा एक कार्यकर्ता तावातावाने भांडत म्हणाला. त्यावर आमचे प्राचार्य ताडकन म्हणाले, ‘‘ हा घ्या फोन. लावा मंत्र्यांना इथूनच फोन? मला खात्री आहे. तुमचे मंत्री असा मला फोन करणार नाहीत. आणि त्यातूनही त्यांनी केला, तर मी त्यांना सारं समजून सांगेन. त्यांना इतर खूप महत्त्वाची काम पडलेली आहेत.’’ या उत्तरावर हा कार्यकर्ता उठून उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘चला साहेब, फार ऐकलं यांचं. उद्या एखाद्या प्रसंगी यांची पार जिरवून टाकू. यांना कॉलेज आपल्या मालकीचं वाटतं, हे लोक खेळांचे सामने असताना कॉलेज बंद ठेवतील, गॅदरिंग असताना कॉलेज बंद ठेवतील किंवा त्यांच्या कुणाची जयंती असेल, तर बंद ठेवतील. त्या वेळी हे त्यांना चालतं.’’

त्यावर मी म्हणालो, ‘‘साहेब हे सारे कार्यक्रम शिक्षणाचाच एक भाग असतो. त्यातूनही मुलं शिकतात आणि आणखी एक अडचण तुम्हाला सांगतो. आज तुम्ही लग्नासाठी इमारत मागितली, उद्या एखादा लावणी स्पर्धेसाठी मागायला कमी करणार नाही. आणखी कुणी खेटरांची सेलवर विक्री करण्यासाठी जागा मागतील. मग कशाला नकार द्यायचा नि कशाला होकार द्यायचा? ही प्रथाच पडून जायची.

फार तर तुम्ही दुसर्‍या एखाद्या कार्यासाठी आमचं मैदान घ्या. त्यावर मंडप टाका. आपली महाविद्यालये ही ज्ञानाची मंदिरे राहू द्या. भजन, कीर्तनाची आणि जेवणावळीची खानावळ करू नका. शांतपणे समजून घ्यावे, अशी आमची विनंती आहे.’’ यानंतर सारेच ताडकन उठून बाहेर पडले. त्यांनी किती समजून घेतले देव जाणे, जाताना खाड खाड असा पायीवर वाजणारा पावलांचा आवाज ऐकला त्यातून त्यांचा रागच व्यक्त होता.

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा,

लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक

व नवृत्त प्राचार्य आहेत.)



from Lokmat Marathi News : Manthan-Main (वैचारिक मंथन-मुख्य)

Bagikan

Jangan lewatkan

जनतेच्या नजरेतील ज्ञानकेंद्रे
4/ 5
Oleh

Subscribe via email

Suka dengan artikel di atas? Tambahkan email Anda untuk berlangganan.