Saturday, March 15, 2014

शरीराचे पावित्र्य

- बी. के. एस. अय्यंगार, कु. गीता अय्यंगार



देहाच्या प्रत्येक पेशीत दैवीशक्तीचा अर्थात प्राणशक्तीचा अंत:प्रवाह चालू असतो, हे सत्य होय. पेशी मरतील; पण शक्ती उरते ती पुढील पेशींसाठी. तेव्हा त्यांचे दैवित्व वा पावित्र्य राखावेच लागते.



तीर्थ विठ्ठल! क्षेत्रही विठ्ठल! देवही विठ्ठल, तर देवपूजाही विठ्ठलच! काया ही पंढरी, तर आत्मा हाच विठ्ठल! कीर्तनात रंगणारी काया ही केवळ आत्म्यासाठीच. योगी हा देहाला कधीच क्षुद्र मानत नाही. त्याची ही देहबुद्धी आत्मज्ञानासाठी असते. देहशुद्धीही आत्मावलोकनासाठी असते. देह टिकावू नाही म्हणून टाकावू ठरत नाही. देहाच्या प्रत्येक पेशीत दैवीशक्तीचा अर्थात प्राणशक्तीचा अंत:प्रवाह चालू असतो, हे सत्य होय. पेशी मरतील; पण शक्ती उरते ती पुढील पेशींसाठी. तेव्हा त्यांचे दैवित्व वा पावित्र्य राखावेच लागते. शरीराच्या कणा-कणांतून नारायणाचे अस्तित्व असते, हे शेवटी सत्य आहे.

शरीर हे केवळ हाडा-मासांनी बनलेले, रक्ताने बरबटलेले विनाशी व अशाश्‍वत आहे, असे विधान विद्वान करतात; तेव्हा हे खरेच आहे. परंतु, आपण जिवंत असेपर्यंत या देहाची शुद्धता व पावित्र्य राखावेच लागते. योगाभ्यासाने हे शरीररुपी साधन शुद्ध व पवित्र करावे लागते. शरीराच्या प्रत्येक अंगांगाचे पवित्रीकरण करावे लागते. शरीराच्या प्रत्येक भागात अधिष्ठात्री देवता असते. त्या देवतांना जागृत ठेवावे लागते. आसन प्राणायामाभ्यासाने ही स्थाने जागृत व शुद्ध करीत, देवतांना जागृत ठेवले जाते; तेव्हा कुठे धारणाभ्यासात ही स्थाने धारणेस योग्य ठरतात.

मनाची प्रवृत्ती संकल्प करणे व मोडणे याकडे असते. मन काही ठरविते व सहजासहजी मोडते देखील. दृढता ही कमीच. तेव्हा प्राणायामाने या मनाला योग्य प्रशिक्षण दिले जाते आणि या स्थितीत बुद्धी या मनाला बांधू शकते, भक्कम करते. विषयासक्त मनाला प्रथमत: निर्विषयी केले जाते ते प्रत्याहाराने. प्रत्याहारीत मन धारणेमध्ये बुद्धीला सहजासहजी हलवू शकत नाही. कारण, तेव्हा धारणेसाठी लागणारे चित्त राजसिक किंवा तामसिक न राहता सात्विक स्थितीत असते, किंबहुना असावे लागते. कारण, सात्विक चित्तच धारणा करू शकते; स्थानबद्ध होऊ शकते. ही स्थानबद्धता शुद्ध शरीराच्या अनेक भागांवर म्हणजे देशावर करता येते. ही सात्विकता अगोदरच्या अभ्यासाने संपादावी लागते. म्हणूनच हे सांगण्यामागील उद्देश म्हणजे धारणेसाठी स्वत:मध्ये ती पात्रता निर्माण करावी लागते.

आपल्या संस्कृती व संस्कारामध्ये पूजाविधी करताना, भगवंताचे नाव घेत न्यास केला जातो. भगवंताला नामासहित आवाहन करून प्रतिष्ठापित केले जाते. याला अंगन्यास व करन्यास असे संबोधले जाते. हे बहुधा दोन्ही बाजूंचे कपाळ, दोन्ही डोळे, दोन्ही नाकपुड्या, दोन्ही कान, दोन्ही हातांचे दंड, नाभी व मस्तक या ठिकाणी केले जाते. या न्यासाअगोदर तीन वेळा आचमन केले जाते. धारणेत ही स्थाने श्‍वासोच्छवास प्रक्रियेने शुद्ध करून, त्यांना आतील योग्य स्थानांवर म्हणजेच देशावर प्रस्थापित करून धारणा केली जाते.

आपल्या शरीरात र्ममस्थाने आहेत. या र्ममस्थानांचे ‘र्मम’ काय आहे, तर त्या ठिकाणी प्राण सूक्ष्मस्वरूपात स्थित असतो. पंचप्राणांना त्या त्या र्ममस्थानात धारण केलेले असते. बोलीभाषेत आपण सहज म्हणतो, अमुक अमुक व्यक्तीने र्ममालाच बोट लावले. शारीरिक इजा र्ममावर झाली, की ती सहजा बरीही होत नाही अथवा र्ममाघाताने मृत्यूही होऊ शकतो. र्ममामध्ये प्राणसंचय असतो, तेव्हा वर सांगितलेले न्यासही अशा ठिकाणी आहेत, की ज्यात प्राणसंचय असतो. हा प्राण योग्य दिशेने नेत प्राणधारणा करावी लागते. यामध्ये मांड्या, गुडघे, गुद, गुप्तभाग, कंठ, तालु, छातीचा मध्य, पाठीचा मध्य, नाभी, हृदय, मस्तक, ऊध्र्वशीर्ष या सर्वांचा समावेश होतो. या स्थानांना ‘देश’ असे संबोधले जाते, तेव्हा संपूर्ण देह हे तीर्थक्षेत्र आहे. असे लक्षात घेऊन योगाभ्यास करायला हवा. ही क्षेत्रे धारणेस योग्य होत.

वरील स्थानांप्रमाणेच आपल्या शरीरात पंचभूतांचे अधिष्ठानही निश्‍चित जागेत आहेत. प्रत्येक पेशी ही पांचभौतिक आहे. तसेच, पंचवायूंचे आधिक्यही त्या त्या क्षेत्रीय भागात असते. शरीरावर जर दृष्टिक्षेप टाकला, तर लक्षात येते, की वर मस्तकाचा भाग, त्या खाली मान, छाती व पाठ, त्याखाली पोट व कंबर, कंबरेखाली अधोदर व गुप्तांग आणि त्याहीखाली पाय,







असे सामान्यत: शरीराचे भाग पडतात. यामध्ये मस्तकाच्या भागात आकाशतत्त्वाचे अधिष्ठान असून, उदानाधिक्य आहे. पोट व कंबर या भागात अग्नितत्त्व अधिष्ठित असून, समान वायूचे आहे. नाभी व नाभीखालील पोट भागात आपतत्त्वाचा अधिकार आहे. आणि पायांत पृथ्वीतत्त्वाचे अधिष्ठान असून, अपान वायूचे आधिक्य आहे, तर व्यान वायूचे आधिक्य प्राणाप्रमाणे सर्व स्थानी आहे. वायूचा संचार सर्वच ठिकाणी असल्यामुळे तो पंचभूतांपर्यंत पोचतो. आसन प्राणायामात ही पोहोच अधिक खोलवर होत जाते. धारणेत त्यांचा शोध लागतो व संशुद्धी होत जाते.

धारणा करताना शरीरातील चक्रस्थाने देखील महत्त्वाची होत. तसेच, शरीरात स्थित असलेल्या देव-देवता, चक्रांच्या अधिष्ठात्री देवता, पंचभूते व पंचवायू यांच्या अधिष्ठात्री देवता यावरही धारणा साधता येते. धारणेस योग्य असलेल्या वस्तू या स्वत:च्या शरीराच्या पलीकडील असल्या, तरी धारणा करता येते. यामध्ये शुभ चिन्ह, शुभ वस्तू, देव-देवतांच्या मूर्ती यांचा समावेश होतो.

मात्र, चित्ताची पकड त्या त्या देशांवर, त्या त्या वस्तूंवर, त्या त्या विषयांवर धारणेमध्ये शुद्ध व शुभ स्वरूपात असने आवश्यक असते. थोडक्यात, धारणेसाठी बाह्यवस्तू किंवा चिन्हे चालू शकतात. चित्ताला जे हृद्य वाटते, त्या वस्तू, ती चिन्हे किंवा देवता यांना धारणेमध्ये चित्त धारण करू शकते. प्रत्याहारामध्ये पंच ज्ञानेन्द्रियांना जेव्हा अंतर्मनात ओढून घेत धरून ठेवले जाते; ते मन अर्थात, इन्द्रियांसहित मन हृदयामध्ये धारण करून तोही धारणेचा विषय ठरू शकतो.

तेव्हा त्या प्रक्रियेचे स्वरूप जाणून घेणे आवश्यक असते. आपण जेव्हा असे म्हणतो की, अमुक व्यक्ती आपल्या ओळखीची आहे किंवा आपली त्या व्यक्तीशी मैत्री आहे, आपले नाते आहे, जवळीक आहे आणि आपण त्यांना ओळखतो आहे, तेव्हा आपण असे धरून चालतो, की ती व्यक्ती आपल्याला पूर्णत: माहीत आहे आणि आपण तिला पूर्ण जाणतो. परंतु, आपण त्या व्यक्तीला पूर्णत: जाणत नाही, किंबहुना जाणत नसतो आणि याची जाणीव आपल्याला नंतर होते. केव्हातरी अनुभवाने कळते, की त्या व्यक्तीची ही चांगली अथवा सदोष बाजू आपल्याला माहीतच नव्हती. कोणतीही व्यक्ती अथवा वस्तू यांचे ज्ञान परिपूर्णत: होत नाही. त्या ज्ञानात कोठे, तरी अपूर्णता असते. कित्येकवेळा त्या व्यक्तीला आपण केवळ आपल्या ज्ञानाची जी कुवत आहे, त्या कुवतीच्या चष्म्यातूनच बघतो. धारणेमध्ये मात्र ही कुवत वाढवावी लागते. भिंग अथवा सूक्ष्मदर्शक यंत्र जसे एखाद्या गोष्टीचा बारीक-सारीक तपशील स्पष्ट करीत जाते, तसेच धारणेमध्ये त्या त्या वस्तू, ते ते विषय स्पष्ट होत जातात. तेव्हा त्या प्रक्रियेचे स्वरूप जाणून घेऊ या.

(लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगाचार्य, लेखिका योगसाधनेचे तत्त्वज्ञान मांडणार्‍या विचारवंत आहेत.)



from Lokmat Marathi News : Manthan-Main (वैचारिक मंथन-मुख्य)

Bagikan

Jangan lewatkan

शरीराचे पावित्र्य
4/ 5
Oleh

Subscribe via email

Suka dengan artikel di atas? Tambahkan email Anda untuk berlangganan.