Pages

Saturday, March 15, 2014

स्वगत

डॉ. निशिगंधा व्यवहारे



पाय सुकले, की रेती गळून पडते आपसूकच, सारे मळभ दूर होते. आताशा मी निवांत बसलेले असते, कुठलेही आरोप, कोणत्याही नात्याने चिकटवले तरी.. नि:स्वार्थीपणावर कोणताच आरोप चिकटून राहू शकत नाही, तो गळून पडतोच फक्त अवकाश मिळतो

तोपर्यंत काळोखही जगून घ्यायचा छंद जपायचा, बाकी सोडून द्यायचे भावनांना सैल.. पाय सुकेपर्यंत..



शून्य.. दोन.. पाच.. पन्नास.. पाचशे.. हजार.. संपतच नाही. हिशेब मांडायला बसलं, आकडेमोड करत राहिलं, तर वजाबाकीच सापडते. काही वेळी हिशेब मांडूच नयेत, कोरीच ठेवावी पाटी. कसले-कसले हिशोब मांडायचे? हिशेब मांडून, आकडेमोड करून भरून येतात का काळोखाच्या पोटात गुडूप झालेले दिवस? भरून येतात का अनादिअनंत काळ सलणारे मनावरचे? घाव अंधाराने गिळंकृत केलेले क्षण प्रकाशाने उजळून येतात का अंगणात परत?

सापडतो का गिरक्या घेत, दरवळत अंगणभर रांगोळी काढणारा मनातला प्राजक्त? सापडेल का पक्ष्यांच्या चिवचिवाटात मनातल्या वेदनांचा कल्लोळ हरवायचा तो काळ? अंधाराचं पांघरुण निग्रहानं दूर करून उगवतीचं स्वागत करणारं माझं मन.. हरवून गेलंय सारं सारं काही. उरलंय ते फक्त कृत्रिम जगणं. श्‍वासांची आवक-जावक तेवढी यांत्रिकपणे सुरू आहे. ही औपचारिकता आहे, की कुठेतरी आहे पानगळतीनंतरच्या अंकुरण्याची आशा.., की हा देखील संभ्रमच? हट्टी, संधिसाधू नियतीने हाहाकार माजविण्याचे काम मात्र चोख बजावलंय. सगळ्या आनंदाला सुरुंग लावत फोडलीत धडाक्यात झाली स्वप्नं. कोण-कोण हरवलंय? काय-काय जळतंय? काय-काय संपलंय? कुणी संपवलंय? उद्ध्वस्ततेची आकडेमोड करत असतीलही आयुष्याचे व्यापारी, पण आतलं तुटलेपण कसं मोजणार?

इथे वळणा-वळणावर दिसतात; ती टांगलेली माणुसकीची लक्तरं. ही कसली दंगल उसळली आहे. माणूस नावाच्या संवेदनशील प्राण्याच्या आत.. आत.. अंतरंगात? संयमाची, समजूतदारपणाची, निस्वार्थतेची कुंपणं केव्हाच नेस्तनाबूत झाली आहेत. देहावर चिकटलेल्या स्वार्थाच्या स्फोटकात इतकी ताकद असते मन, आत्मा, सदसद्तेला मारायची?

हे जग कुठे गेलंय? नात्यांवर कशी फोफावलीये निवडुंगांची वस्ती? कशी सडू लागली नीतिमत्तेची मनात रुजलेली झाडे? समजलाच नाही हा जगाच्या बदलाचा, व्यवहाराचा नियम मला कधी. हे अज्ञानच पुरले असावे आतले ‘माणूसपण’ शिल्लक ठेवण्यासाठी?

हातावर ठेवली गेलीत काटेरी झुडपे.. फुलांच्या बदल्यात. आतलं माणूसपण संपविण्याची ही तयारी तर नाही ना? इथे विसावू नयेत, असे वाटते का रंगनक्षी सोडून जाणारी फुलपाखरे? मनाचं वाळवंट व्हावं आणि इथंही फोफावू द्यावी वस्ती निवडुंगांची आणि बोचत राहावे आयुष्यभर कुणाला तरी हा डाव आहे नियतीचा. हा प्रवाहीपणा आयुष्याला वाहून नेणारा आहे, ओळखून आहे मी, ही योजना आहे. ज्यांच्या खांद्यांवर आपला विश्‍वास विसावतो, नेमका तिथंच घात होतो. मनाची कवाडं उघडी ठेवूनही नेमके आपणच जायबंदी होतो. सुटत जातात हात हातातले.. तुटत जातात मनं.. ही नातीही खरंच खूप फसवी असतात, चकवत राहतात आयुष्यभर. जितकी जपायचा प्रयत्न करू तितकी पळत राहतात लांब-लांब वाकुल्या दाखवत.

बेहिशेबी प्रेमाचे उत्तर कुणीतरी मग हिशेब मागत विचारत राहतं, ज्या नात्यांकडे पाहून जगायचे बळ मिळतं, जिथे बघून जगणं शिकू पाहतं मन, तिथलेच फूत्कार जास्त विषारी डंख मारतात, तेव्हा विव्हळता येत नाही आणि वेदनेकडे दुर्लक्षही करता येत नाही. सैरभैर, अस्थिर मन आतून डगमगू लागतं आणि उतरु लागतो काळोख आतवर, निवडुंगही फोफावू पाहतो नकळतपणे.

किट्ट काळोखातही मागितलेल्या हिशेबांचे आकडे फिरू लागतात डोळ्यांपुढे.. बेहिशेबी प्रेमाचा मालमत्तेचा ताळेबंद कसा मांडायचा? जमतंच नाही; तरीही हा व्यवहार मनाला.. समोरच्या व्यक्तींनी आपापल्या सोयीने मारलेला शिक्का मग मिरवत राहायचा, आयुष्यभर अस्तित्वाला चिकटवून, जन्माचे वाईटपण घेऊन झुरत राहायचे.. मरत राहायचे.. कुठले तरी नाते मरू नये म्हणून सरत राहायचे. उत्तर तरीही सापडत नाही, हिशेब जुळतच नाही.

धडपडत राहायचे, जिवाचा आटापिटा करायचा सुटून जाऊ नये नात्यांची साथ म्हणून; पण हे सगळे म्हणजे समुद्राकाठी खेळताना पायाला लागलेली रेती काढण्यासाठी पाण्यात जाऊन पुन्हा-पुन्हा पाय ओले करण्यासारखे आहे. संभ्रमित मनाला विचारांच्या या अशाच खेळाची देणगी असते.

पाय सुकले, की रेती गळून पडते; आपसूकच, सारे मळभ दूर होते. आताशा मी निवांत बसलेले असते, कुठलेही आरोप, कोणत्याही नात्याने चिकटवले तरी.. नि:स्वार्थीपणावर कोणताच आरोप चिकटून राहू शकत नाही, तो गळून पडतोच फक्त अवकाश मिळतो तोपर्यंत काळोखही जगून घ्यायचा छंद जपायचा, बाकी सोडून द्यायचे भावनांना सैल.. पाय सुकेपर्यंत..

(लेखिका साहित्यिक आहेत.)



from Lokmat Marathi News : Manthan-Main (वैचारिक मंथन-मुख्य)

No comments:

Post a Comment